Wednesday, November 29, 2006

स्वत:विषयी :- अनिल अवचट

पुस्तकाच्या नावावरुनच आपल्या लक्षात येतं की हे पुस्तक त्यांच्या जीवनावर आधारीत आहे.परंतु वाचल्यावर कळतं की हे आत्मचरित्र नव्हे. यात घटनाक्रम,तत्कालीन घटना, भोवताल्च्या व्यक्ती सामावण्याचा अट्टाहास नाही. स्वत:च्या पुर्वायुष्यात बुडी मारुन त्यातील अनुभव गाठीशी बांधणे हाच या पुस्तकाचा उद्देश. स्वत: अवचटांनीच हे नमूद केलं आहे.
अशा प्रकारच्या पुस्तकात शक्यतो समाजाने व नियतीने लेखकावर कसा अन्याय केला व त्यातून लेखक कसा घडत गेला याचं चित्रण असतं. पण 'स्वत:विषयी' मात्र या साच्यातही बसत नाही. याउलट अवचटांनी स्वत:च केलेल्या काही चुका, त्यातून ओढ्वणारे प्रसंग, वॆद्यकीय महाविद्यालयातील मॊजमस्ती, हुशारी व कुवत असुनही केवळ कष्ट न घेतल्याने आलेलं अपयश याचं स्वत:चं समर्थन न करता केलेलं भाष्य आहे. पुढील आयुष्यात पत्नी सॊ. सुनंदा यांनी केलेली मोलाची साथ. किंबहुना पत्नीमुळेच जीवनाला मिळालेलं ध्येय आणि साफ़ल्यही.

स्वत:चं शालेय शिक्षण ते स्वत:च्या दोन मुलींच्या शालेय शिक्षणापर्यंतचं वर्णन.पुस्तकातील कालावधी हा एवढाच. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अवचटांचा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतु. ते म्हणतात की, माझ्या हातून कळत नकळत बर्याच चुका झाल्या. काही कालावधीनंतर त्या मला उमगल्य़ा पण तेव्हा वेळ गेलेली होती. पण आपण चुका केल्या याचा सल मात्र होता. तो सतत डाचतो. ते अपराध, त्या चुका जेव्हा मी कागदावर उतरवल्या तेव्हा त्या जाहीरपणे कबुल केल्याने असेल कदचित, पण मनाला शांती लाभली.

मला खुप आवडलं हे. आपणही अशा बर्याच चुका अनवधानाने , अवधानाने करत असतो. बर्याच वेळा वाटतं की आपण त्यावेळेला असं वागलं नसतो तर किती बरं झालं असतं. त्याचा सल राह्तो मनात.
अवचटांसारखी हुशारी, लेखनशॆली व धॆर्य असतं तर आपणही या टोचणीतून मुक्त होऊ शकलो असतो.
असो. माझं जावू देत.

पुस्तक वाचून अवचटां बद्द्लचा आदर दुण्यावल्यावाचून रहात नाही हे नक्की.
एकदातरी जरूर वाचावं.



Monday, November 27, 2006

पानिपत: विश्वास पाटील

पानिपत वाचण्यापूर्वी ह्या युद्धाबद्दल काहीबाही कल्पना होत्या (आपल्या बरयाच जणांचे असेच मत असेल) की पेश्व्यांची राजवट, "भाऊंची कर्तबगारी (किंबहूना त्याची ना-कर्तबगारी) वगैरे वगैरे.. हि कादंबरी वाचल्यानंतर मात्र हे सगळे गैरसमज कुठ्ल्याकुठे पळुन जातात.

कादंबरीकार विश्वास पाटील यांनी एक उदात्त हेतु ठेऊन ह्या क्रुती ची निर्मीती केली आहे.. "पानिपताच्या युद्धाबद्द्ल चुकीच्या कल्पनांना बाजुला सारण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावा गोळा करणे, आणि सदाशीवराव भाऊंच्या कर्तुत्वाला उजाळा देणे." या दोन्ही हेतुंमधे लेखक पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. यातच त्यांचे यश सामावले आहे.

"पानिपत" ... माझ्या मते, आधुनिक मराठी साहित्यातील एक अप्रतिम साहित्यक्रुती असेच ह्या ऐतिहासीक कादंबरीचे वर्णन करावे लागेल. ह्या कादंबरी ची संकल्पना / विषय, ह्या विषया वरील संशोधनाची लेखकाने घेतलेली कष्टप्रद जबाबदारी, कादंबरीची मांडणी, सदाशिवराव भाऊंच्या चरीत्राचे सार्थ चित्रण - सारंच कसं - कौतुकास्पद.

मराठ्यांचे पानिपत होण्याची खरी कारणे : भाऊंचे चुकीचे निर्णय, मराठी वीरांचा पळपुटेपणा, नव्हे तर पेशव्यांचा देवभोळेपणा, अंतर्गत दुही व असंतोष (रघुनाथ दादा, मल्हारराव होळकर, व ईतर हितचिंतक यांच्या क्रुपेने ) आणि नजीबाचे कुटील आणि यशस्वी कारस्थाने हेच होत. पेशव्यांचा देवभोळेपणा - हा विषेश नोंद केलेला आहे.. सदाशीवराव भाऊंच्या सैन्याबरोबर पेशव्यांनी ५०००० भाविक (पन्नास हजार मात्र !) पाठवलेले होते. "ऊत्तरेत जातच आहात तर ह्या लोकांना काशी चे दर्शन घडवुन आणा" असा पेशव्यांनी आग्रह केला. जेव्हा यास विरोध दाखवला, तेव्हा त्यांच्या वीरत्वावर शंका घेण्यात आली.