Wednesday, November 29, 2006

स्वत:विषयी :- अनिल अवचट

पुस्तकाच्या नावावरुनच आपल्या लक्षात येतं की हे पुस्तक त्यांच्या जीवनावर आधारीत आहे.परंतु वाचल्यावर कळतं की हे आत्मचरित्र नव्हे. यात घटनाक्रम,तत्कालीन घटना, भोवताल्च्या व्यक्ती सामावण्याचा अट्टाहास नाही. स्वत:च्या पुर्वायुष्यात बुडी मारुन त्यातील अनुभव गाठीशी बांधणे हाच या पुस्तकाचा उद्देश. स्वत: अवचटांनीच हे नमूद केलं आहे.
अशा प्रकारच्या पुस्तकात शक्यतो समाजाने व नियतीने लेखकावर कसा अन्याय केला व त्यातून लेखक कसा घडत गेला याचं चित्रण असतं. पण 'स्वत:विषयी' मात्र या साच्यातही बसत नाही. याउलट अवचटांनी स्वत:च केलेल्या काही चुका, त्यातून ओढ्वणारे प्रसंग, वॆद्यकीय महाविद्यालयातील मॊजमस्ती, हुशारी व कुवत असुनही केवळ कष्ट न घेतल्याने आलेलं अपयश याचं स्वत:चं समर्थन न करता केलेलं भाष्य आहे. पुढील आयुष्यात पत्नी सॊ. सुनंदा यांनी केलेली मोलाची साथ. किंबहुना पत्नीमुळेच जीवनाला मिळालेलं ध्येय आणि साफ़ल्यही.

स्वत:चं शालेय शिक्षण ते स्वत:च्या दोन मुलींच्या शालेय शिक्षणापर्यंतचं वर्णन.पुस्तकातील कालावधी हा एवढाच. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अवचटांचा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतु. ते म्हणतात की, माझ्या हातून कळत नकळत बर्याच चुका झाल्या. काही कालावधीनंतर त्या मला उमगल्य़ा पण तेव्हा वेळ गेलेली होती. पण आपण चुका केल्या याचा सल मात्र होता. तो सतत डाचतो. ते अपराध, त्या चुका जेव्हा मी कागदावर उतरवल्या तेव्हा त्या जाहीरपणे कबुल केल्याने असेल कदचित, पण मनाला शांती लाभली.

मला खुप आवडलं हे. आपणही अशा बर्याच चुका अनवधानाने , अवधानाने करत असतो. बर्याच वेळा वाटतं की आपण त्यावेळेला असं वागलं नसतो तर किती बरं झालं असतं. त्याचा सल राह्तो मनात.
अवचटांसारखी हुशारी, लेखनशॆली व धॆर्य असतं तर आपणही या टोचणीतून मुक्त होऊ शकलो असतो.
असो. माझं जावू देत.

पुस्तक वाचून अवचटां बद्द्लचा आदर दुण्यावल्यावाचून रहात नाही हे नक्की.
एकदातरी जरूर वाचावं.



1 comment:

Sheetal Bhangre said...

मी हे पुस्तक वाचलय. मला सलग वाचण्याची ओढ़ लावानार्या अनेक पुस्तकांपैकी ते एक आहे. त्यांचे मुलींच्या संगोपनाचे अनुभव तर सुंदरच. इतरांपेक्षा वेगळी दृष्टी ठेवून केलेले ते संगोपन आहे.